मुंबई : सेवानिवृत्त, ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची (home construction project) नियमावली महारेराने जाहीर केली असून, त्यांच्याकरिता उभारणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमावलीत इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, लिफ्ट आणि रॅम्पस, जीना, प्रकाश योजना आणि वायुविजन, सुरक्षा आणि सुरक्षितता या घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश विकासकांना दिले आहेत. ही नियमावली राज्यभरात लागू करण्यात आली असून, या तरतुदींचा विक्री करारात समावेश करावा लागणार आहे.
महारेराने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांच्या आदेशाचा मसुदा हा सूचना आणि मतांसाठी जाहीर केला होता. अनेकांनी त्याचे स्वागत करून सूचना केल्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांसोबत काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्रपणे सूचना केल्या. या निर्देशांना अंतिम स्वरूप देताना सूचनांचा उपयोग झाला.
शौचालयात अलार्मची व्यवस्था
स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी.
स्नानगृहात सहजपणे पकडता येईल, असे हँडल्स वाश बेसीन, शॉवर, शौचालयाजवळ असावे. शौचालयामध्ये न घसरणाऱ्या टाइल्स असाव्यात.
शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा.
इमारतीमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था असावी. दरवाजा, शौचालय, शयनगृहात आणि सार्वजनिक क्षेत्रात अलार्मची स्वतंत्र बटणे असावीत. बेड, शौचालय आणि शॉवरच्या बाजूला आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी अलार्मची व्यवस्था असावी.
सुरक्षारक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावेत.
नियमावलीचे पालन करूनच प्रकल्प उभारावा
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वी जारी केली होती. त्याचा आधार हे निर्देश तयार करताना घेतला.
आता सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प असा दावा करून प्रकल्प उभा करायचा असेल तर या नियमावलीचे पालन करूनच प्रकल्प उभा करावा लागेल.
व्हीलचेअर, जिन्यासाठी प्रशस्त जागा असणार
अनेक मजल्यांच्या इमारतीला लिफ्ट आवश्यक आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात कुठल्याही अडथळ्याशिवाय व्हीलचेअरवर फिरता आले पाहिजे.
रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजे ९०० एमएमपेक्षा मोठे असावेत.
दरवाजे स्लायडिंगचे असावेत. हँडल्स, कड्या व्यवस्थित पकडता येतील, असे असावेत. फर्निचर वजनाला हलके, अणकुचीदार टोकांशिवाय असावे. लिफ्टला दृकश्रव्य व्यवस्था असावी. लिफ्टमध्ये व्हीलचेअर आतबाहेर करता यावी.
प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचायांना सहज हालचाल करता येईल, अशी लिफ्ट अत्यावश्यक आहे, जिन्यांची रुंदी १,५०० एमएमपेक्षा कमी नसावी. जिन्याच्या बाजुला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये, दोन पायऱ्यांमधील अंतर फार असू नये. जिना १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.
वाचा : फक्त दोन कागदपत्रे दाखवून मिळणार म्हाडाचे घर; 10 दिवसात मिळेल घराची चावी