मुंबई : म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी निघणार असून इच्छुकांनी कागपत्र जमा करण्यास सुरवात केली आहे. लवकरच मुंबईतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यासाठी आम्ही तुम्हाला गोरेगाव येथील सॅम्पल फ्लॅट बद्दल माहिती देणार आहोत. त्यानंतर म्हाडाची अजून 1200 घर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत.
कामाठीपुरा पुनर्विकासाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून या आराखड्यानुसार या पुनर्विकासाअंतर्गत 100 टक्के अधिमूल्य (प्रीमियम) पर्यायाद्वारे म्हाडाला अंदाजे 1200 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या पर्यायानुसार 600 कोटी रुपये महसूल आणि दक्षिण मुंबईत सोडतीसाठी अंदाजे 1200 घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हा आराखडा राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ बांधकामासाठी निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील 77,945.29 चौरस मीटर जागेवर कामाठीपुरा वसले असून या कामाठीपुऱ्यातील सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत.
त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. मंडळाने कामाठीपुऱ्याचे सर्वेक्षण पूर्ण केले असून व्यवहार्यता अभ्यासास मान्यता घेऊन या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार केला आहे. माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागाराने आराखडा पूर्ण करून नुकताच तो म्हाडा प्राधिकरणाला सादर केल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
म्हाडाकडे सादर झालेल्या हा आराखडा राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आाखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.