मुंबई, नवी-मुंबई व ठाण्यात घरे 25 टक्क्यांनी महागणार

मुंबई: मुंबईतील विशेषत: उपनगरीय झोपडपट्टी पुनर्विकासातील विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) दर दुप्पट केल्यामुळे मुंबईतील घरांच्या किमती येत्या वर्षात किमान 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

सहा महिन्यांपूर्वी मुलुंड पूर्व उपनगरात टीडीआरचे दर प्रति चौरस फूट 3,500 रुपये होते. त्यात हळूहळू वाढ होत असून आता हे दर प्रति चौरस फूट सहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, पश्चिम उपनगर बोरिवलीमध्ये सहा महिन्यांपूर्वी प्रति चौरस फूट टीडीआर दर तीन हजार रुपये होता. ते दर आता 5,700 रुपयांवर पोहोचले आहेत.

मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट सध्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी मुंबई आणि उपनगरात दीड लाखांहून अधिक घरांची विक्री झाली होती. गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत 40 हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विकासकांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. बहुतेक विकासक मूळ जागेव्यतिरिक्त अधिक घरे बांधण्याच्या उद्देशाने टीडीआर खरेदी करतात. मागणी वाढल्यामुळे टीडीआर दरात लक्षणीय वाढ झाल्याचे उद्योग तज्ञांनी विश्लेषण केले आहे.

टीडीआर म्हणजे काय?

भूखंडावर किती बांधकाम करता येईल याची मर्यादा चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) द्वारे निश्चित केली जाते. तथापि, विकासकाला मंजूर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम करायचे असल्यास, विकासक इतर प्रकल्पांकडून विकास हक्क खरेदी करू शकतो. या टीडीआरद्वारे तो संबंधित जमिनीवर निश्चित एफएसआय मर्यादेपेक्षा जास्त बांधकाम करू शकतो. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास करणाऱ्या विकासकाला संबंधित जमिनीनुसार विशिष्ट टीडीआर दिला जातो. हा टीडीआर इतर प्रकल्पांमध्ये अतिरिक्त बांधकाम म्हणून वापरला जाऊ शकतो.

कच्चा मालही महाग

घरांच्या किमती वाढण्यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे एकीकडे विकासकांना महागड्या दराने टीडीआर घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे घरे बांधण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

वाचा : तारीख ठरली! सिडकोच्या सोडतीसंदर्भातील मोठी अपडेट

Leave a Comment