नवी मुंबई : उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळ सिडकोने उभारलेली व्यावसायिक दुकानांवर अक्षरश: ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. त्यामुळे ही छोटी दुकाने सिडकोने दिलेल्या दराच्या तिप्पट दराने विकली गेली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या लिलावातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. 18 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे दुकान 1 कोटी 20 लाख रुपयांना विकले गेले.
बामणडोंगरी रेल्वे स्थानकासमोर सुमारे पाच हजार घरांचा मोठा निवासी प्रकल्प सिडकोने उभारला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 243 छोट्या व्यावसायिक गाळे निर्माण करण्यात आले आहे. गाळे विक्री करण्यासाठी सिडकोने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिन्यात ई-लिलाव करण्यात आला. मात्र तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर डाऊन झाल्याने ई-लिलाव थांबवण्यात आला. त्यामुळे या गाळ्यांसाठी पुन्हा ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या गाळ्यांना सुमारे तीन पट वाढीव दर मिळाला.
या गाळ्यांच्या विक्रीसाठी सिडकोने प्रति चौरस मीटर दोन लाख रुपये किंमत सांगितली होती. मात्र, प्रत्यक्षात गाळ्यांची विक्री दोन ते तीन पटीने जास्त दराने झाली. मोक्याच्या ठिकाणी असलेला क्रमांक 40 येथील गाळा थेट 1 कोटी 20 लाख रुपयांना विकला गेला. या भूखंडाचे क्षेत्रफळ केवळ 18 चौरस मीटर आहे.
छोट्या दुकानांना ग्राहकांची पसंती
नवी मुंबईतील प्रत्येक भागात छोट्या दुकानांना मोठी मागणी आहे. मात्र दुर्दैवाने ही दुकाने बिल्डरकडून बांधली जात नाहीत. बहुतांश व्यावसायिक छोटी दुकाने शोधत असतात. उलवे नोडमधील सिडकोची दुकाने आकाराने लहान होती, त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. परवडणाऱ्या घरांप्रमाणे परवडणारी दुकानेही खाजगी बिल्डरांनी बनवावीत, असे मत बांधकाम व्यावसायिक प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.
वाचा : मुंबईत मागेल त्याला म्हाडाचे घरे..! म्हाडाचे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री?