मुंबईतील म्हाडाचे तीन प्रकल्प रद्द होणार, वाचा सविस्तर यादी

मुंबई : महारेराने राज्यातील एक हजार 750 व्यापगत ( लॅप्स) प्रकल्पांची नोंदणी निलंबित केली असून आणखी एक हजार 137 प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे. व्यापगत नोंदणी निलंबित यादीत म्हाडाच्या मुंबई मंडळाचे तीन प्रकल्प असल्याचे उघडकीस आले आहे. या तिन्ही प्रकल्पांचे कामे सध्या सुरू असून या प्रकल्पांतील घरांची सोडतीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. पण आता मात्र हे काम बंद पडण्याची चिन्हे असून म्हाडाची चिंता वाढली आहे. परिणामी, या प्रकल्पांची पुर्ननोंदणी करण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांना दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती देणे बंधनकारक आहे. नोंदणीच्या वेळी नमूद केलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण न केल्यास महारेराकडून मुदतवाढ घेणे आवश्यक असते. या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना व्यापगत यादीत समाविष्ट करून प्रकल्पाचे काम बंद केले जाते, तसेच घराची विक्रीही थांबविण्यात येते.

अशा व्यापगत यादीतील एक हजार 750 प्रकल्पांची नोंदणी नुकतीच महारेराने निलंबित केली आहे. या यादीत म्हाडाच्या मुंबई मंडळातील तीन प्रकल्पांचा समावेश आहे. गोरेगाव, सिद्धार्थनगर येथील अल्प गटातील घरांचा प्रकल्प, विक्रोळीतील अल्प आणि मध्यम गटातील प्रकल्प, तसेच कोपरी पवई येथील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

म्हाडाच्या तीन प्रकल्पांची नावे समोर आल्यानंतर आता म्हाडाला खडबडून जाग आली आहे. संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडून तिन्ही प्रकल्पांची माहिती मागविण्यात आल्याची माहिती प्राधिकरणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या प्रकल्पांची पुर्ननोंदणी वा यातून मार्ग काढण्यासाठी महारेराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा : म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथे घरे

Leave a Comment