नाशिकमध्ये घर घ्यायचा विचार करताय? ही बातमी वाचाच

नाशिक : कोरोनाकाळात सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पांना अनेक अडचणी आल्या. या काळात गावी गेलेले बहुतांश मजूर परत आले नाही. परिणी घरांचे दर वाढले. मात्र, त्यानंतरदेखील बांधकाम व्यावसायिकांनी घरे जुन्याच दराने विकली. मात्र, आता निर्माणाधीन प्रकल्प संपले. नवीन घरांना अनेक प्रकारच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे.

एका सर्व्हेनुसार देशभरात घरांच्या किमती सरासरी दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. नाशिकमध्ये त्या तुलनेत कमी दर वाढले असले तरी नवीन प्रकल्पातील घरे मात्र दहा टक्के किंवा अधिक महाग होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील गृहनिर्माण क्षेत्र तेजीत आहे. अन्य महानगरांच्या तुलनेत घरांचे दरदेखील कमी आहेत त्यातच बांधकाम क्षेत्रातील नियमावलीचे बहुतांश नियम पाळले जात असल्याने नाशिकमध्ये गुंतवणूकदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, आता नाशिकमध्ये घरांचे दर वाढू लागले आहेत. देशभरातच घरांचे दर वाढले आहेत. त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत.

मजुरीचे दर वाढले आहेत. सिमेंट आणि स्टीलच्या दरातही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे महारेरासाठी कन्सलटंट, सीए, इंजिनिअर नियुक्त करून अहवाल देणे असे अनेक प्रकार आहेत. मोठ्या गृहनिर्माण संस्थांना तर पर्यावरण कर भरून नियमानुसार एसटीपी तयार करणे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ग्रे-वॉटर ट्रीटमेंट अशा अनेक प्रकारच्या सुविधा कराव्या लागतात. त्यामुळे देखील बांधकाम खर्चात वाढ झाल्याचे नाशिक क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सांगितले.

घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या

देशभरातील सर्व्हेनुसार घरांच्या किमती वाढत असून, अलीकडे त्या दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, नाशिकमध्ये साधारण पाच टक्के इतक्याच वाढल्या आहेत. नवीन प्रकल्पाच्या वेळी अनेक प्रकारची कामे वाढली आहेत. महारेरापासून जीएसटीपर्यंतचा खर्च वाढला आहे. बांधकाम आणि प्लास्टरचे काम करायचे तरी मजुरीत वाढ झाली आहे.

सर्वांत महाग घरे या परिसरात

गंगापूररोड

गंगापूररोड परिसर सर्वात विकसित होणारा भाग असून, शांत भाग म्हणून परिचित आहे. एक नवीन उपनगर ठरावा इतका मोठा हा भाग विकसित होत असून या ठिकाणी बांधकामाचे दर ७ ते ९ हजार रुपये असे आहेत. मोठ्या गृहनिर्माण संस्था हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

गोविंदनगर

नाशिक- मुंबई महामार्ग आणि त्याला लगतच असलेला नाशिक-पुणे मार्ग तसेच सिटी सेंटर मॉल नजीक नवविकसित भागात गोविंदनगर भागात हॉट प्रॉपर्टी आहेत. या ठिकाणीदेखील सुविधा चांगल्या असून सध्या या भागात बांधकामाचे. दर ५ ते ८ हजार रुपये असे आहेत.

इंदिरानगर

इंदिरानगर येथून पाथर्डीपर्यंतच्या भागातदेखील घरांना अधिक मागणी आहे. हा भाग असल्याने दळणवळणाची सुविधा चांगली आहे. या ठिकाणी सध्या बांधकामाचे दर ४ हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पाथर्डी फाटा परिसरातही घरांना मागणी आहे.

म्हणून वाढल्या घरांच्या किमती

स्टीलचे दर ६४ तर सिमेंटचे दर ३४५ ते ३८५ रुपये प्रति ५० किलो याप्रमाणे दर महागले आहेत. सर्वांत जास्त या दरवाढीचाच फटका बसला आहे. जमिनीचे दर नाशिकमध्ये वाढले आहेत. त्यामुळे त्यावर आधारित विकास शुल्क वाढले आहेत. तसेच मजुरीचे दर वाढले आहेत. प्लास्टर, पेंटिंग असे सर्वच दर वाढले आहेत.

घरांचे दर वाढण्याची विविध कारणे आहेत. याशिवाय वस्तू खरेदी करतानाही जीएसटी आणि नंतर घर विकतानाही जीएसटी अशा दुहेरी जाचामुळे देखील घरांच्या किमती वाढल्या आहेत. प्रोजेक्टसाठी बँकांदेखील वित्तपुरवठ्यास हात आखडता घेत आहेत.

– ⁠कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो

वाचा : पुण्यात स्वस्तात घर घेण्याची शेवटची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे नऊ दिवस

Leave a Comment