Mhada Lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ घेणाऱ्या विकासकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडे सुपूर्द केलेल्या घरांच्या किमती परस्पर वाढवल्याचे उघड झाले आहे. ठाण्यातील अशाच एका प्रकल्पात म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीत सहा लाख रुपयांनी वाढ करण्यात आल्याने खरेदीदार चिंतेत आहेत.
कोकण गृहनिर्माण मंडळाने वर्तकनगर, ठाणे येथे रेमंड कन्स्ट्रक्शनने बांधलेल्या ३२२ चौरस फुटांच्या घरांची २० टक्के योजनेअंतर्गत १५ लाख ३८ हजार ७०० ते १५ लाख ४१ हजार ४०० रुपयांपर्यंत विक्री किंमत निश्चित केली होती. मात्र, दिलेल्या विक्री किंमत पत्रकानुसार रेमंड कन्स्ट्रक्शनने या खरेदीदारांना, किंमत 21 लाख 25 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.
पत्राची पावती देण्यासही नकार
म्हणजे म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा सहा लाख रुपये जास्त आहेत.मात्र या विषयाबाबत खरेदीदारांनी रेमंड कन्स्ट्रक्शनला पत्र लिहून किंमत कमी करण्याची विनंती देखील केलेली आहे. परंतु खरेदीदारांनी सांगितले की रेमंड कन्स्ट्रक्शनने पत्राची पावती देण्यासही नकार दिला. विकासकाने निश्चित केलेल्या किमतीनुसार या घरासाठी या खरेदीदारांना 24 लाख 14 हजार 550 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आगाऊ मालमत्ता कर, सेवा आणि वस्तू कर यांचा समावेश आहे.
Mhada Lottery
ठाण्यातील विहंग वूड प्रकल्पात विकासकाने म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीनुसार खरेदीदारांना विक्री मूल्य पत्रक दिले आहे. मात्र, रेमंड रियल्टीने म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा ६ लाख रुपये जास्त रक्कम समाविष्ट केली होती. याबाबत कोकण गृहनिर्माण मंडळाचे प्रमुख मारोती मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, विकासकाने म्हाडाने निश्चित केलेल्या विक्री किमतीएवढी रक्कम आकारावी. त्यात वाढ करता येणार नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणाची आम्ही चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.
दरवाढीचा बचाव करताना रेमंड रियल्टीचे प्रशांत राठोड यांनी कोकण गृहनिर्माण मंडळाने परवानगी दिल्याचा दावा केला. फक्त म्हाडाने आम्हाला खरेदीदारांकडून ठाणे महापालिका विकास शुल्क ,पायाभूत सुविधा शुल्क, आणि मेट्रो उपकर वसूल करण्याची परवानगी दिलेली आहे. अशा प्रकल्पामध्ये वीज, पाणी, गॅस, रस्ते आदी सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधांचा खर्च खूप जास्त असल्याचा दावा राठोड यांनी केला.
हेही वाचा : सिडकोची पुन्हा एकदा 14000 घरांसाठी लॉटरी? cidco lottery 2023