गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी? गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा निर्णय

मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसात संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे ‘आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य सरकारकडून कोणतेही ठोस धोरण रावबिले जात नसल्याचा आरोप करीत मंगळवारी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकले. आझाद मैदानावर जमलेल्या गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी निदर्शन केले. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत सावे यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला बोलवत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले.

गिरणी कामगार संघर्ष समितीने मंगळवारी गिरणी कामगारांच्या घरांसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धडकले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गिरणी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. ‘कोरडी आश्वासने नको, ठोस पावले उचला’ अशी घोषणाबाजी करीत कामगार आक्रमक झाले. या आंदोलनाची दखल घेत सावे यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवले. यावेळी सावे यांनी येत्या आठ दिवसात गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्मण मंत्री, सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि गिरणी कामगार संघटना यांच्याही बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे आता गिरणी कामगारांचे लक्ष लागले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने ठोस निर्णय घेऊन गणेशोत्सवापर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर गिरणी कामगार रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला.

म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी काढणार! वाचा काय आहे सर्वसमावेश गृहयोजना

Leave a Comment