Navi Mumbai : सिडको महामंडळाने नुकतीच बामनडोंगरी येथील दुकानांसाठी ऑनलाइन बोली पद्धतीने लिलाव आयोजित केला होता. मात्र लिलाव अंतिम टप्प्यात असताना सिडकोच्या संकेतस्थळावर काहीच हालचाली होत नसल्याने गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत लिलावात काही काळेबेरे असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत सिडको मंडळाने स्पष्टीकरण देऊन काही काळांसाठी तांत्रिक अडथळे आल्याने ही अडचण झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर गुंतवणूकदारांनी बामणडोंगरी येथील दुकानांचा लिलावाचा कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा अशी मागणी समाजमाध्यमांवर केली आहे.
सिडको मंडळातील महागृहनिर्माणाची आणि दुकानांची सोडत ऑनलाइन पद्धतीने होते. दक्षिण नवी मुंबईत विक्रीसाठी अजूनही सिडको महामंडळाला वाव असल्याने या परिसरातील घर, भूखंड आणि दुकाने यांच्या लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे सिडकोच्या तिजोरीत भर पडत आहे. सिडकोने यापूर्वीही भूखंड लिलाव आणि महागृहनिर्माणातील घर व दुकानांच्या सोडतीची प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केला आहे.
नुकत्याच झालेल्या बामणडोंगरी येथील दुकानांच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांनी सिडकोच्या कार्यप्रणालीविषयी साशंकता व्यक्त करत बोली लावताना ऐन वेळेला बंद पडलेल्या ऑनलाइन पद्धतीमुळे लिलावात सामील होता आले नसल्याचा आरोप करत ही प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी समाजमाध्यमांवरून केली आहे. तसेच हा लिलाव पुन्हा आयोजित करावा अशीही अनेक गुंतवणूकदारांनी मागणी केली आहे. काही काळासाठी तांत्रिक अडचण झाली होती असे स्पष्टीकरण सिडको महामंडळाच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिले. तर या घटनेनंतर सिडको लवकरच प्रक्रियेत अडथळे का आले याची तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी एक संधी
गुंतवणूकदारांच्या संतापानंतर जाग आलेल्या सिडकोने संबंधित ई-लिलावाद्वारे होणाऱ्या दुकानांच्या बोली विक्रीच्या योजनेला आणखी एक संधी देणार असे जाहीर केले आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे ज्या बोलीदारांनी नोंदणी प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे आणि ईएमडी रक्कम भरली आहे त्यांना ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
वाचा : पुण्यातील म्हाडाची 1BHK आणि 2BHK घरांची सविस्तर माहिती, किंमत 14 लाखांपासून