मुंबईत कलीना येथे म्हाडाचे फ्लॅट विक्रीस..! या लोकांना करता येणार अर्ज

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीच्या माध्यमातून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची संधी राजपत्रित अधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीत कलिना येथील मैत्री प्रकल्पातील रिक्त 14 घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उच्च उत्पन्न गटातील ही घरे केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आरक्षित आहेत.

कलिना, कोळे कल्याण येथील भूखंडावर म्हाडाच्या 13 (2) योजनेअंतर्गत राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी ‘मैत्री प्रकल्प’ बांधला आहे. त्यातील 12 मजली इमारतीत एकूण 72 घरांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश घरे अंदाजे 1345 चौरस फुटांची आहेत. हा प्रकल्प विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. या मैत्री प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून गेल्या वर्षापासून मैत्री प्रकल्पातील पात्र सदस्यांना ताबा देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत अनेकांनी घराचा ताबा घेतला आहे.

या प्रकल्पास अंशत: निवासी दाखला मिळाला असून निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पातील 1345 चौरस फुटांची 14 घरे रिक्त आहेत. या रिक्त घरांचे काय करायचे असा प्रश्न मंडळासमोर होता. राजपत्रित अधिकाऱ्यांनाच या घरांचे वितरण करणे आवश्यक होते. त्यामुळे राजपत्रित अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवून त्यांना घराचा ताबा देण्याचा विचार पुढे आला. मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या रिक्त घरांचा समावेश 204 मधील सोडतीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली.

मंडळाच्या या निर्णयानुसार 14 घरांचा समावेश सोडतीत करण्यात येणार असून ही घरे केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांसाठीच आरक्षित असणार आहेत. ही घरे उच्च गटातील असल्याने राजपत्रित अधिकाऱ्यांना वार्षिक 12 लाखांहून अधिक उत्पन्नाची मर्यादा लागू असणार आहे. सोडतीत या घरांचा समावेश करण्यात आल्याने राजपत्रित अधिकाऱ्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घर खरेदी करता येईल.

किंमत दोन कोटींच्या आसपास

मैत्री सोसायटीतील पात्र सदस्यांना मैत्री प्रकल्पातील 1345 चौरस फुटाच्या घरांचे 1 कोटी 55 लाख रुपयांना वितरण करण्यात आले आहे. ही किंमत दीड-दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे आता आगामी सोडतीमधील मैत्री प्रकल्पातील रिक्त 14 घरांसाठी नव्याने किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या घरांची किंमत दोन कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दोन कोटी रुपयांच्या आसपास किंमत असली तरी मोक्याचे ठिकाण पाहता आणि बाजारभाव पाहता राजपत्रित अधिकाऱ्यांना परवडणाऱ्या दरात मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

वाचा : पवई, गोरेगाव, विक्रोळी येथील म्हाडाच्या घरांची होणार विक्री..! या दिवशी करता येणार अर्ज

2 thoughts on “मुंबईत कलीना येथे म्हाडाचे फ्लॅट विक्रीस..! या लोकांना करता येणार अर्ज”

Leave a Comment