सिडकोच्या 3 हजार 322 सदनिकांसाठी पाच हजार अर्ज, यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

नवी मुंबई : सिडको 3 हजार 322 सदनिकांची संगणकीय सोडत प्रक्रिया जाहीर करून विजेत्या सदनिकाधारकांची नावे घोषित करण्यात आली. परंतु 3 हजार 322 सदनिकांसाठी अवघे पाच हजार अर्ज आल्याने सिडकोचे महागृहनिर्माण धोरण फसल्याची चर्चा आहे. शुक्रवारी बेलापूर येथील सिडको भवनातील सभागृहात ही सोडत प्रक्रिया पर्यवेक्षक मोईझ हुसेन आणि सोडतीमधील अर्जदारांपैकी तीन सदस्यांच्या देखरेखीखाली पार पडली.

यंदा २६ जानेवारी रोजी द्रोणागिरी आणि तळोजा येथील महागृहनिर्माण योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. सहा महिन्यांत अवघे पाच हजार अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तळोजातील चार वर्षांपूर्वी काढलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना यंदा सदनिकांचा ताबा मिळाल्याने अर्जदारांना समाजमाध्यमांवर सिडकोच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला होता.

तळोजातील प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची टंचाई, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कमतरता यामुळे अर्जदारांनी या सोडतीमध्य सुद्धा तळोजाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र सिडकोच्या जनसंपर्क विभागाने नेमके किती अर्ज तळोजा व द्रोणागिरीसाठी आले आहेत याची माहिती दिली नाही. सिडकोतर्फे नवी मुंबई, पनवेल व उरणचा विकास वेगाने केला जात आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांसाठी ३ हजार ३२२ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तळोजा वसाहतीमध्ये नुकतीच मेट्रोसेवा सुरू झाली.

द्रोणागिरी परिसर हा जेएनपीटी बंदरालगतचा असून या परिसरात नेरुळ-उरण रेल्वेच्या जोडणीमुळे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होत असल्याने भविष्यात वाणिज्यिक मोठ्या संधी नागरिकांना मिळणार आहेत. शुक्रवारच्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery. cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम लवकरच परत केली जाईल, असेही सिडकोच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.

वाचा : नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार, पहा सविस्तर माहिती

Leave a Comment