पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने गेल्या महिन्यात विविध उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्ज करण्याची मुदतही संपली होती, मात्र आता काही जणांना या घरांसाठी अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीनंतर म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे.
म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात 4877 सदनिका देण्याची घोषणा केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख गुरुवारी (30 मे) रात्री होती. निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कर्मचारी तैनात असल्याने विविध कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता नागरिकांना 6 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सध्याची मुदतवाढ ही शेवटची मुदतवाढ असल्याचे म्हाडाने जाहीर केले. म्हाडाच्या सोडतीसाठी 7 मार्चपासून नोंदणी सुरू झाली आहे. या सोडतीमध्ये म्हाडा योजनेंतर्गत 2416 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर, म्हाडाच्या विविध योजनांतर्गत 18 सदनिका, म्हाडा पीएमएवाय योजनेंतर्गत 59 सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेंतर्गत 978 सदनिका, पुणे शहरातील योजनेच्या 20 टक्के फ्लॅट्स आहेत. या अंतर्गत 745 सदनिकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 561 फ्लैट आहेत.
म्हाडाचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटवर करा
http://www.mhada.gov.in
https://mhada.gov.in
यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल होती. त्यानंतर अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवून अर्ज करण्याची संधी देण्यात आली. आता म्हाडाने तिसऱ्यांदा मुदत वाढवली आहे. सध्या दिलेली मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच सुधारित सोडतीचे वेळापत्रकही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अधिकाधिक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी केले.
म्हाडाच्या घरासाठी लागणारी कागदपत्रे
1. आधारकार्ड 2. पॅनकार्ड 3. डोमासाईल सर्टिफिकेट 4. उत्पनाचा पुरावा 5. आयकर रिटर्न